आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपचीच सत्ता येईल. भाजपला दोनशे जागा मिळतील पण देशाचा पंतप्रधान कोण होणार हे सांगता येणार नाही, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नारायण राणे शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. या मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात राणे यांचा स्वाभिमान पक्ष व सुभाष पाटील यांची मराठवाडा विकास सेना एकत्रित आली आहे. सुभाष पाटील यांना स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तर जिल्हाध्यक्षपदी माजी महापौर सुदाम सोनवणे यांची निवड घोषित केली.
यावेळी बोलताना राणे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळणार नाही. दोनशेच्या आसपास उमेदवार निवडून येतील, त्यामुळे पंतप्रधान कोण होईल हे सांगता येणार नाही, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. पक्षाच्या वतीने पाच जागा स्वतंत्रतपणे लढण्यात येणार आहेत. चंद्रकांत खैरे यांच्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, खासदार खैरे यांची सर्व कुंडलीच माझ्याकडे आहे. निवडणूक काळात ऐनवेळी त्याविषयावर बोलेन पण सुभाष पाटलांमुळे खैरे यांचा पराभव निश्चित झाला आहे. सेना-भाजपची युती सत्तेसाठी झाली आहे. साडेचार वर्षे भाजप सरकारविरुद्ध ओरड करणार्या सेनेने लाचारी पत्कारित युती केल्याची टीकाही राणे यांनी व्यक्त केली.यावेळी पत्रकार परिषादेला सुभाष पाटील, माजी महापौर सुदाम सोनवणे, रमेश सुपेकर, सदानंद शेळके यांनी नगरसेविका पद्माबाई शिंदे आदी उपस्थित होते.